राज्यातील ६० हजार अंगणवाड्यांना वीज जोडणीसाठी २० कोटी रुपयांची तरतूद करणार – मंत्री मंगलप्रभात लोढा
तीन महिन्यात राज्यातील ६० हजार अंगणवाड्यांना वीज पुरवठा होईल
नागपूर, दि. २९ : “राज्यातील ६० हजार अंगणवाड्यांना वीज जोडणी नाही. तेथे वीज जोडणी देण्यासाठी २० कोटी रुपयांची तरतूद करून येत्या तीन महिन्यात या सगळ्या अंगणवाड्यांना वीज पुरवठा होईल”, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज विधानसभेत दिली. याशिवाय, अंगणवाडी कार्यकर्तींना मानधन वाढविण्याचा प्रस्ताव नियोजन विभागाकडे पाठविण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
सदस्य सुनील टिंगरे यांनी यासंदर्भात प्रश्न विचारला होता. त्याला उत्तर देताना मंत्री श्री. लोढा यांनी ही माहिती दिली.
ते म्हणाले की, राज्यात १ लाख १० हजार अंगणवाड्या आहेत. त्यापैकी ९५ हजार ग्रामीण भागात तर १५ हजार शहरी भागात आहेत. ग्रामीण भागात अंगणवाड्यांचे वीज देयक देण्याची जबाबदारी संबंधित जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत यांची असते. परंतु काही ठिकाणी निधी अभावी हे पैसे दिले गेले नसल्याने अशा अंगणवाड्यांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला. राज्यात वीज जोडणी नसलेल्या ६० हजार अंगणवाड्या आहेत. महिला व बालविकास विभागाकडून २ कोटी रुपयांची तरतूद करून तेथे वीज जोडणी दिली जाईल, अशी माहिती मंत्री श्री. लोढा यांनी दिली.
याशिवाय, अंगणवाड्या बळकटीकरणासाठी आपण राज्यातील ५ हजार अंगणवाड्या स्मार्ट बनवत आहोत. याशिवाय, अंगणवाडी दत्तक योजना आपण राबवित आहोत. त्यासाठी समाजातील विविध संस्था, उद्योग यांना पत्र पाठवून त्यांच्या सीएसआर मधून निधी मिळविण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती मंत्री श्री. लोढा यांनी दिली.
ग्रामविकास विभागाला सांगून जिल्हा परिषदेच्या सेस निधीतून १० टक्के निधी महिला व बालविकास विभागाला देण्याचा निर्णय यापूर्वी झाला आहे. तो निधी मिळाला तर हा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
अंगणवाड्यांमध्ये सामान्य कुटुंबातील मुले शिकतात. त्यांच्यासाठी आपण विविध उपक्रम हाती घेत आहोत. मुंबई मध्ये आपण २०० कंटेनर अंगणवाडी सुरू केल्या आहेत. याशिवाय, झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पामध्ये २०० बालवाडी सुरू करण्यात आल्याची माहिती मंत्री श्री. लोढा यांनी दिली.
या चर्चेत सदस्य राहुल कुल, बाळासाहेब पाटील, संग्राम थोपटे, यशोमती ठाकूर यांनी सहभाग घेतला.
What's Your Reaction?